मूर्ख माकड आणि राजा
एक माकड एका राजाचं भक्त होतं आणि राजाचाही त्याच्यावर विश्वास होता. राजाने त्याला आपला अंगरक्षक म्हणून नेमलं होतं. राजवाड्यात कधीही ये-जा करण्याची त्याला परवानगी होती.
एके दिवशी राजा झोपला होता. माकड त्याच्या शेजारी बसून त्याला पंख्याने वारा घालत बसलं होतं. राजाच्या छातीवर एक माशी येऊन बसली. माकडाने तिला पंख्याने बरेचदा हाकलूनही ती पुन्हा पुन्हा येऊन बसत होती.
शेवटी माकडाने एक धारदार तलवार घेतली आणि माशीवर वार केला. माशी तर उडून गेली पण राजाच्या छातीचे दोन तुकडे झाले आणि तो मेला.
म्हणूनच म्हणतात की मूर्खांशी मैत्री करण्याने नुकसान होऊ शकतं.
अशातच, दुसरीकडे एका नगरात एक विद्वान ब्राह्मण रहात होता. पण गरिबीमुळे तो चोर झाला होता. एकदा दुसऱ्या गावातून चार ब्राह्मण त्याच्या गावात आले. व्यापार करून त्यांनी काही पैसे कमावलेले या ब्राह्मणाने पाहिले. त्याच्या मनात आलं “काहीही करून मी यांचे पैसे चोरायला हवेत!” या विचाराने तो या ब्राह्मणांकडे गेला आणि गोडगोड बोलून त्याने त्यांच्याशी जवळीक साधली.
त्या ब्राह्मणांनी कमावलेल्या पैशातून मौल्यवान रत्नं विकत घेतली. ती रत्नं एका पुडीत ठेवून ती पुडी त्यांनी आपल्या मांडीशी बांधून ठेवली. या चोराने हे बघून असं ठरवलं की आपण त्यांच्या सोबतच राहू आणि संधी मिळताच रत्नं चोरू. गोडगोड बोलून तो त्या ब्राह्मणांबरोबर निघाला.
या पाचजणांना रस्त्यात पाहुन कावळे ओरडले “दरोडेखोरांनो! धावा धावा! खूप मालदार माणसं आहेत ही. यांना मारून यांचं धन हिसकावून घ्या!”
हे ऐकून या पाचजणांना दरोडेखोरांनी घेरलं आणि त्यांची झडती घेतली. पण त्यांना काहीच सापडलं नाही. दरोडेखोर म्हणाले “हे कावळे कधीच खोटं बोलत नाहीत. तुमच्याकडे जे काही धन आहे ते मुकाट्याने आम्हाला द्या. नाहीतर आम्ही तुम्हाला मारून ते घेऊ!”
हे ऐकून चोर-ब्राह्मणाने विचार केला की जर दरोडेखोरांनी या ब्राह्मणांना मारलं तर त्यांच्याकडची रत्नं त्यांना मिळतील. मला काहीच मिळणार नाही. शिवाय माझ्याकडेही रत्नं आहेत असं वाटून ते मलाही मारून टाकतील.
या विचाराने तो पुढे आला आणि म्हणाला “दरोडेखोरांनो! असं असेल तर तुम्ही आधी माझीच नीट झडती घ्या!”
त्याबरोबर दरोडेखोरांनी त्याची झडती घेतली आणि काहीच न मिळाल्यामुळे त्याला त्यांनी मार मार मारलं. इतर ब्राह्मणांकडेही काहीच नसेल असा विचार करून दरोडेखोरांनी त्यांना मात्र जाऊ दिलं.
अशा रीतीने एका बुद्धिमान शत्रूने त्या ब्राह्मणांचे प्राण वाचवले.
म्हणूनच म्हणतात की विद्वान शत्रू मूर्ख मित्रापेक्षा कितीतरी चांगला असतो.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
International